रविवार, जानेवारी ०३, २०१०

जान है तो जहान है!

जान है तो जहान है!

भारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. असे हल्ले कुणावरही मेलबर्न मध्येच नाही तर जगात कुठेही, भारतातही होऊ शकतात. यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा हा प्रयत्न.

- तुमचा आतला आवाज जर सुरेक्षेसाठी साद घालत असेल तर ऐका! सुरक्षेसाठी तुमच्या सिक्थ सेंस वर भरोसा ठेवा. तुमची असुरक्षित असल्याची भावना तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवत असते.

- कायम सतर्क रहा आणि आत्मविश्वासाने चाला. गोंधळल्यासारखे फिरू नका. चुकले असलात तरी! तुमची आत्मविश्वासू चाल हल्लेखोराचा आत्मविश्वास डळमळवते.

- शक्य असेल तर पर्सनल अलार्म बरोबर बाळगा. त्याच्या आवाजाने त्वरीत मदत मिळू शकते आणि हल्लेखोर घाबरू शकतो.

- संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर पार्क सारख्या अंधार्‍या आणि निर्जन जागा टाळा, शक्य असेल तर सोबतीला कुणी येते आहे का ते पाहा. कुणी बरोबर नसल्यास दुरचा असला तरी सुरक्षित मार्गच वापरा.

- किमती वस्तू दागिने अंगावर बाळगणे टाळा पण काही पैसे मात्र नक्की बरोबर ठेवा. (काही वेळा लुटारू काहीच मौलवान मिळाले नाही म्हणूनही मारहाण करू शकतात.)

- अनोळखी लोकांशी बोलणे टाळा. प्रसंगी तसे वागणे उद्धट वाटले तरी 'सुरक्षा प्रथम' हे ध्यानात घ्या.

- कुणी तुमचा पाठलाग करते आहे असे वाटले तर त्वरील गर्दी / लोक आहेत अशा ठिकाणी जा, पोलिसांशी संपर्क साधा, मदत मागा.

- अनोळखी ठिकाणी मद्यपान व पेयपान करू नका. अनोळखी लोकांकडून खाद्य-पेय स्विकारू नका.

- शक्य असेल तर ज्युडो कराटे शिकवणारा स्व-संरक्षणाचा एखादा कोर्स करा.

सार्वजनिक रेल्वे बस इत्यादी वापरतांना
-एकटे असाल तर शक्य तोवर वाहनाची वाट पाहणे टाळा आपल्या वेळापत्रकाची माहिती करून घ्या आणि वेळेवरच पोहोचा.

- रेल्वेचे तिकिट घेतांना स्टेशनवरील व्यक्तींचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करा.

- सुरक्षित वाटत नसेल तर गाडी येई पर्यंत स्टेशनवर जाणे टाळा.

- जवळपास क्लोज सर्किट कॅमेरे असतील त्याच्या रेंज मध्येच रहा.

- कुणी तुम्हाला त्रास देत असेल असेल तर त्या व्यक्तीला तसे न करण्या विषयी ओरडून सांगा. त्यामुळे इतरांचे लक्ष तेथे वेधले जाईल. आणि ती व्यक्ती बचावात्मक धोरण स्विकारेल. शक्य असेल तर सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांना बोलवा.

- बस स्टॉपवर असाल तर पुर्ण उजेड असलेल्या ठिकाणी थांबा. शक्य असेल तर इतर लोकांसोबत राहा.

- शक्य तोवर रेल्वेचे पुर्ण रिकामे डबे टाळा. शक्य असेल तेंव्हा ड्रायवरचा मागचा डबा वापरा.

- एकटेच टॅक्सीने जाणार असाल तर हात दाखवून टॅक्सी बोलावण्या पेक्षा फोन करून टॅक्सी बोलवा. या मुळे तुम्ही टॅक्सी बोलावल्याची नोंद झालेली असते.

- टॅक्सीच्या नंबरची नेहमीच नोंद ठेवा. ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला (क्लीनर साईडला) बसा. बोलतांना अनोळखी ठिकाणी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नका.

कार ने जातांना
- आपली कार परत आल्यावरही भरपूर प्रकाश असलेल्या सुरक्षित अशा ठिकाणीच पार्क करा.

- कार लॉक केली आहे हे पाहून घ्या. कारच्या किल्ल्या सुरक्षित ठेवा.

- आपल्या कारच्या आसपास संशयास्पद व्यक्ती दिसत असल्यास कार पासून दूरच राहा, शक्य असल्यास इतरत्र मदत मागा.

- अनोळखी ठिकाणी कार पार्क केली असेल तर कार मध्ये शिरण्या पुर्वी मागच्या सीटवर आणि सीटच्या खाली कुणी नाहीये, हे पाहून मगच कारचे दार उघडा.

- एकदा कार मध्ये बसल्यावर सर्व दारे आतून लॉक करून घ्या आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचे पर्यंत काचा वरच/बंद ठेवा.

फोन
- सार्वजनिक फोनला आवश्यक असलेली चिल्लर कायम स्वतः बरोबर ठेवा. मोबाईल फोन हरवल्यास/चोरीला गेल्यास अथवा सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला मित्रांना, नातेवाईकांना किंवा पोलिसांना फोन करता येईल.

- पब्लिक बुथ मधून फोन करत असलात तर डायल केल्या नंतर फोन कडे पाठ करून उभे राहा म्हणजे बाहेर काय चालले आहे हे तुम्हाला सतत दिसत राहील.

- कुणी तुम्हाला धमकी देत तर असेल वाट पाहू नका, त्वरित पोलिसांना फोन करा.

- आपत्काळात मदतीसाठी फोन केल्यावर प्रथम नाव सांगा व परिसराचे नाव माहिती नसल्यास दिसणार्‍या प्रमुख खाणा-खुणा सांगा.

या झाल्या प्राथमिक सुरक्षेच्या गोष्टी.
आता वैयक्तिक सुरक्षा विस्ताराने पाहु या.
आपल्या सुरक्षेचा विचार करून ठेवणे हिताचे असते.त्यासाठी एक योजना बनवलेली हवी. आपली सुरक्षा योजने विषयी नातेवाईकांशी, मित्रांशी बोला, त्यात काही तृटी आहेत का ते वारंवार तपासून पाहा. इतर लोक आपली सुरक्षा कशी सांभाळतात याचाही आढावा घ्या. त्यांच्या योजनेतले तुम्हाला उपयोगी पडणारे भाग तुमच्या योजनेत घेवून टाका!

मात्र लक्षात ठेवा तुम्हाला जी योजना सर्वात सुरक्षित वाटते, तीच तुम्हाला योग्य आहे.
- 'असा हल्ला माझ्या कधी होणारच नाही' असा विचार करू नका. परिस्थिती सांगुन येत नसते!

- तुमची सुरक्षा धोक्यात असेल तर मदत मागायला मागे-पुढे पाहू नका.

- आपत्काळात कुणाशी संपर्क साधणार आहात याची यादी ठेवा. शक्य तो फोन नंबर्स पाठ करा. शक्य नसेल तर लिखित स्वरूपात जवळ ठेवा. मोबाईलवर विसंबू नका!
आपल्या सुरक्षा योजनेचे भाग तपासून घ्या

- - मी जेथे जाणार आहे तेथला सर्वात सुरक्षित कार पार्क कुठे आहे?

- सगळ्यात जवळचा बस स्टॉप/ रेल्वे स्टेशन कुठे आहे?

- मी नेहमी जात येत असलेल्या इमारतींची सुरक्षा दारे कुठे आहेत ते पाहून ठेवा.

- येण्या जाण्याचे सर्वात सुरक्षित मार्ग पाहून ठेवा आणि नेहमी तपासत राहा.

- येण्याजाण्याच्या मार्गावर प्रकाश आहे का ते पाहून घ्या.

- माझ्या रोजच्या मार्गावर कुणी चढून बसण्या जोगी झाडे आहेत का? अथवा अशी ठिकाणे आहेत का याचा विचार करा. असल्यास तेथून सुरक्षित अंतर किती याचा विचार आधीच करून ठेवा.

- सर्वात जवळचा सार्वजनिक फोन कुठे आहे ते पाहून ठेवा.

- वेळ प्रसंगी कुणाला सोबत घेवून जाऊ शकतो याचा विचार करून ठेवा. इतरांना सोबत म्हणून जात जा. (म्हणजे इतरही तुमच्या सोबत येतील!)

- तुम्ही असलेल्या ठिकाणाहून सुरक्षितरित्या पळून जाण्याचा माग कोणता आहे हे पाहून ठेवा!

- पळून जाऊन सुरक्षा घेण्यासाठी कुठे जाणार आहात याचा विचार करून ठेवा. तशाच मार्गाचा विचार करून ठेवा.

तुम्ही सर्वसाधारण कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त थांबून काम करणार असाल तर
- तुमच्या सोबत कुणी असेल असे पाहा, नसल्यास तुम्ही तेथे आहात याची कल्पना अजून कुणाला तरी देवून ठेवा.
- चपळाईने निसटण्यासाठी दारांच्या आणि कारच्या किल्ल्या हाताशी ठेवा.

स्व संरक्षण
स्व संरक्षणाची अशी कोणतीही एकच पद्धत अस्तित्त्वात नाही. निरनिराळ्या परिस्थितीत वेगवेगळे उपाय कामी येतात.
प्रतिहल्ला - तुमच्यावर हल्ला झाला प्रतिहल्ल्याने हल्लेखोर गोंधळतो, घाबरतो आणि तुम्हाला पळायला आवश्यक असलेला क्षण मिळतो.
प्रतिहल्ला हा अनेक प्रकारे करता येतो.
- जोरात ओरडा
- कानात किंचाळा
- नाक, गळा डोळे आणि जननेंद्रिये अशा नाजूक ठिकाणी फटका द्या
- पायावर लाथ मारा
- बरगडीत कोपर खुपसा
- तुमच्याकडे असलेली छत्री, पर्स, किल्ल्या, अगदी ओढणीही हल्ले खोराचे डोळे क्षणिक झाकण्यासाठी शस्त्रासारखी वापरता येते हे लक्षात ठेवा. ते वापरून स्वतःला सुरक्षित करा.

शांततेत सुरक्षा
शांततेत सुरक्षा म्हणजे प्रतिहल्ला शक्य नसेल तर काय करावे याची तयारी/चाचपणी.
- मनाशी खंबिरपणे शांत रहा
- हल्लेखोरासोबत आत्मविश्वासाने पण नम्रतेने बोला, त्याला हल्ला करण्यापासून परावृत्त करा, त्याचे लक्ष इतरत्र वेधा आणि त्या क्षणी आपली सुरक्षितता शोधा.
- सर्व बारिक सारीक गोष्टी नजरेने टिपून ठेवा. त्याचा कसा वापर करता येईल याचा विचार करा.

खरे तर सुरक्षेसाठी कोणतीही अशी एकच व्यवस्था आणि योजना शक्य नाही. परिस्थिती आणि व्यक्तीनुसार वागा.
आशा आहे की याचा उपयोग होईल.
तुम्हाला अजून काही उपाय माहिती असतील तर मलाही द्या.


- निनाद

मंगळवार, मे ०५, २००९

समरीतन गर्ल्स

समरीतन गर्ल्स हा एक कोरियन चित्रपट आहे.

किशोरवयीन आणि अजून शाळेत असलेल्या दोन मैत्रिणी याओ जीन आणि जाए याँग. युरोपला जाण्यासाठी म्हणून पैसे मिळवण्याच्या मागे लागतात. आणि त्या साठी त्या चक्क वेश्या व्यवसायाचा मार्ग स्विकारतात. जाए पुरुषांसोबत जाते तर याओ तीच्यासाठी गिऱ्हाइके मिळवते आणि पोलिसांवर लक्ष ठेवते. या सगळ्यात जाए याँग आनंदी असते आणि ती चक्क एका भारतीय बुद्धकालीन वारांगनेचा संदर्भ देते आणि म्हणते की तीच्या बरोबर जी माणसे संग करायचे ते निर्वाणाला पोहोचायचे. परंतु याओ ला हे पटत नाही. दर वेळी ती कुणा पुरुषा कडून आल्यावर याओ जीन तीला संपुर्ण आंघोळ घालते.

अशाच एका वेळी याओचे दुर्लक्ष होते आणि जाए असलेल्या त्या मोटेलवर पोलिस धाड घालतात. पोलिसांपासून वाचण्यासाठी जाए दोन मजले उंच असलेल्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारते. यात तीच्या डोक्याला मार बसतो आणि ती इस्पितळात मरते. पण त्या आधी ती तीच्या एका आवडलेल्या संगितकार असलेल्या क्लाएंटला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. याओ त्या माणसाला भटून त्याला सांगते पण तो यायला तयार होत नाही. जेंव्हा तो तायर होतो तोवर जाए मृत्यू पावलेली असते.

जाए याँगच्या मृत्युचे कारण याओ जीन आपणच आहोत असे मानते. ही टोचणी कमी करण्यासाठी म्हणून ती ठरवते की ज्या लोकांनी जाए याँग ला पैसे दिले आहेत, त्यांना भेटून त्याच पद्धतीने ते पैसे परत करायचे. आणि ती तसे करायला सुरुवातही करते. तीचे वडील एक कडक पोलिस अधिकारी असतात. ते एका धाडीमध्ये तीला समोरच्या इमारतीत एका पुरुषासोबत पाहतात. आणि अस्वस्थ कोलमडून पडतात. ते तीच्या एका एका क्लायंटला भेटून अल्पवयीन मुलीशी संबंध का ठेवतो असे प्रश्न विचारून बदडायला सुरुवात करतात. हा हिंसकपणा वाढत जाऊन यात एका गिऱ्हाईकाचा मृत्यू होतो.

मग वडील मुलीला घेऊन गाव सोडण्याचेच ठरवतात आणि प्रवासाला निघतात. पण या बरोबर असण्याच्या काळात दोघांनाही एकमेकांचे काहीतरी बिनसलेले आहे हे जाणवत असते पण कुणीच काही बोलत नाही. प्रचंड अस्वस्थता असतांनाच पोलिस तीच्या वडिलांना पकडतात.

एकुणच किशोरवयात असलेली मुले/मुली एखाद्या गोष्टीच्या मागे लागून काय करू शकतात याचे उदाहरण. त्यापेक्षा पुढे जाऊन कुंटुंबात एकमेकांशी मोकळेपणानी संवाद साधणे किती महत्त्वाचे आहे हा विचारही मनात आल्याशिवाय राहिला नाही.

किम की दुक या कोरियन लेखक - दिग्दर्शकाचा हा चित्रपट. ठीक ठीक वाटला.

कलाकार

जाए याँग - हॅन याओ ऱ्युम

याओ जीन - क्वाक जी मिन

२००४ मध्ये चित्रपटाला बर्लीन चित्रपट मोहोत्सवात सिल्व्हर बेअर मिळाले आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी २७, २००९

वुबी, उबंटु आणि काही जुन्या स्मृती

काल उबंटु ही लायन्क्स बेस्ड नवी प्रणाली टाकण्याचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही!

ubuntu-fail-message


c:\ubuntu\install\MD5SUMS-metalink.gpg येथे आल्यावर

'डाउनलोड इस् इंटरप्टेड विथ् एरर' असा निरोप येत राहिला.

३ -४ वेळा असे झाल्यावर नाद सोडला.
काही मदत मिळेल का?

हे मी वुबी नावाचे सॉफ्टवेयर वापरून करतो आहे.

वुबी शिवाय काही पर्याय?
मला माझे एक्स पी हवे आहे. कारण त्याची सवय झाली आहे. जे काय कोसळायचे होते दुरुस्त करत करत आता एक्स पी स्टेबल झाले आहे.
शिवाय विन्डोज खुप काळापासून वापरतो आहे.

आवांतरः काही माझ्याही जुन्या स्मृती जागृत झाल्या!

पुर्वी मी डॉस वापरले आहे. ते ५१२ केबीच्या फ्लॉपीवर असत असे.
मग त्याचे पुढील व्हर्जन ६.२० आले. हे १.२ च्या फ्लॉपीवर असत असे.
६.२२ हे पुढचे १.४४ एमबी च्या फ्लॉपीज् वर आले.

त्याकाळी लोटस १२३ हे स्प्रेडशीट सॉफ्टवेयर इतके मस्त वाटत असे.
आणि वर्डस्टार तर टायपींगवाल्यांना चमत्कार वाटत असे.

त्याकाळात माझ्या एका मित्राने वींडोज वापर म्हणून सुचवले.
त्याच्या कडे एक कॉपी होती. त्याने ती मला आग्रहाने दिली.
(अति आवांतरः दादरला एका ठिकाणी सगळी सॉफ्टवेयर्स कॉपी करून मिळत. तेथे पोलिसांनी धाड घातली. आणि सगळ्या फ्लॉपीज एका सुतळीत ओऊन पोलिस स्टेशनच्या धुळीत ठेऊन दिल्या. अनेक महिन्यांनंतर खटला उभा राहील्यावर त्यातली एकही चालली नाही! आणि खटला निकाली निघाला - अर्थात पुढे पोलिसही सुधारले! (असे वाटते!) असो,)

मग पहिल्यांना विन्डोज १.२ च्या फ्लॉपीज वापरून
२.६ डॉस च्या प्रॉम्प्टवरून
२० एम बी ची भल्ली मोट्ठी (!) हार्ड डिस्क असलेल्या
०८६ मशिनवर लोड केले. (त्याकाळी मशिन हा शब्द बरोब्बर फिट बसायचा इतके ते डब्बे जड असत!)

ते विन अशी कमांड देवून डॉस वरून सुरु करावे लागत असे.

त्याकाळात सॉफ्टवेयर ते हार्डवेयर काहीच आजच्या इतके स्टेबल नव्हते.
शिवाय व्हायरसेस चा सुळसुळाट होता. एकदा डार्क ऍव्हेंजर नावाच्या व्हायरसने मला खुप पिडले होते.
त्यामुळे एक नावडती का होईना पण विंडोजशी ऍटॅचमेंट झाली आहे.

आता उबंटु हवे तर लोड होत नाहीये!


-निनाद

उबंटु आणि वुबी चे दुवे असे आहेत.

वुबी http://wubi-installer.org/ - विंडोज असतांनाच उबंटु आपल्या मशिनवर टाकण्याचे साधन

उबुंटु www.ubuntu.com येथुन उतरवुन घेता येईल किंवा सिडी घरपोच आणि फुकट सुद्धा मागवता येईल.

शनिवार, जून २८, २००८

वाचनालये

संगणकीय वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
भारतात संदर्भग्रंथांची तशी प्राचीन परंपरा आहे. अगदी किर्तनातही ओवी अथवा अभंग कुठून घेतला हे आवर्जून सांगितले जाते. मात्र ही इतकी समर्थ परंपरा विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात लुप्तच झाली की काय असा संशय येतो.
अनेक विद्यार्थी जेंव्हा मागच्या वर्षीचाच कुणीतरी केले प्रोजेक्ट सरळ पहिले पान लावून सुपूर्त केलेले वाचतो, पाहतो तेंव्हा अजूनच वाईट वाटते. पण अशी लिखित कामाची चोरी करायची नाही ,हा भाव वाढतो आहे असेही जाणवतेच. वाचनालयांचीही रया बरेचदा गेलेली असते.मुळात आपल्याकडे वाचनालयांना
एक प्रकारची जी दुय्यम अवस्था/मानसिकता प्राप्त झाली आहे,
ती बदलणे महत्वाचे आहे.

त्यात काम करणारे एक तर अतिशय मग्रुर, पुस्तके म्हणजे वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे असतात किंवा अगदीच दीन दुबळे गरिब आणि तंत्रज्ञानाशी चुकूनही संबंध न आलेले असतात. पुण्याच्या भांडारकर प्राच्यचे पुस्तकाचे दालन खरं तर घरा घरात पोहोचले पाहिजे असे आहे.

या शिवाय, माझ्यामते आज मराठी मधे संदर्भांचा शोध घेणे फार अवघड काम आहे.
कारण बहुतेक लेखन पिडिएफ फॉर्मॅटमध्ये चित्र स्वरूपात आहे. हा फार मोठा अडथळा आहे. कारण जालावर शब्द दिला तरी चित्र स्वरुपातले लिखाण शोधकिड्यांद्वारे वाचलेच जात नाही. फक्त युनिकोडीत लिखाणाचाच शोध मिळतो.

अर्थातच त्यामुळेही जालावरील पुस्तके सापडू शकत नाहीत.
स्कॅन केलेले देवनागरी शब्द ओळखणारी प्रणाली विकसित होणे या साठी महत्वाचे आहे. मग मराठीतील पुस्तक स्कॅन करून युनिकोडित करता आले तर त्या सारखी बहार नाही. आशा आहे की यावर काही काम होईल.
पण माझ्या लिखाणात, इंग्रजीतील ज्ञानसंपदा भारतात विकण्यासाठी विदेशी संस्थांना पैसा मिळण्यापेक्षा एखाद्या भारतीय संस्थेला मिळावा, हा पण उद्देश आहेच.

तर, या संशोधनात्मक लेखनासाठी कुणी, कधी, काय काम एखाद्या विषयावर केले आहे हे समजण्यासाठी डिजिटल लायब्ररी ला काही पर्यायच नाही. याला अनेकदा विदागार (डेटाबेस) असेही म्हंटले जाते. इंग्रजी मध्ये संशोधनाचे लेखन प्रचंड प्रमाणात झालेले आहे. हे सगळे लेखन नुसते शोधणे, हा सुद्धा एक अवघड प्रकार बनला आहे. या साठी संशोधनाच्या लेखनाचा साठा उपलब्ध करून देणार्‍याच काही कंपन्या आहेत. या कंपन्या सर्व साधारण पणे विद्यापीठांशी करार करतात व त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरून त्यांच्या लेखन् साठ्यामध्ये प्रवेशाची मुभा देतात. यामुळे त्या कंपन्यांना पैसे मिळतात व ते अजून अजून लेखन एका छत्राखाली आणू शकतात. मात्र आज त्या साठ्यातही एखाद्या विषयावरचा लेख शोधायचा असेल,
तर त्या त्या विषयाचे काम करणारे स्वतंत्र समुह किंवा कंपन्या आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठाच्या वाचनालयाच्या संकेत स्थळावरून अशा विदागारात शिरण्याची मुभा त्या विद्यार्थ्यांना आहे.

मात्र आत शिरल्यावर अशी विदागारेही खुप असतात. मला आत्ता दिसत असलेली फक्त ए अक्षरातली विदागारे १० आहेत. या विदागारांमधे असलेली अजून माहिती वेगळीच.
यात इन्फॉर्मिट A+ Education (Informit) आणि प्रोक्वेस्ट सारखी नावे दिसतात
ABI/Inform Dateline (ProQuest)
ABI/Inform Global (ProQuest)
ABI/Inform Trade & Industry (ProQuest)
वर पाहिलेत तर कळतेच की शोधणे सोईचे व्हावे म्हणून प्रो क्वेस्टने ही आपल्या विदागाराचे भाग करून ठेवले आहेत.

अशा रीतीने इंग्रजीतील डिजिटल वाचनालये वाढत आहेत. कोणत्याही प्रकारे एकच संशोधन परत परत होण्याची शक्यता टाळण्याचा प्रयत्न आहे. त्या वाचनालयांची एकमेकांशी जोडणी करून घेण्याचा वेगही वाढत आहे. त्यात असलेला धनाचा संग्रही वाढता आहे.
आज ऑस्ट्रेलियातील कोणत्याही वाचनालयाचे पुस्तक एकत्रीत जोडणीमुळे सहजतेने शोधता येणे शक्य होते आहे.
इतकेच काय ते मिळवण्याचीही सोय केली जाते आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या फी मधून वर्षाच्या सुरुवातीलाच एक रक्कम घेतलेली असते.

संशोधनाच्या अनेक लेखांमध्ये भारतीय नावे संशोधक म्हणून दिसत असली, तरीही या सगळ्या व्यवसायात भारतीय वाचनालये कुठेही नाहीत ही मात्र खेदाने नोंदवावेसेच वाटते.
आशा आहे की एक दिवस असा नक्की येईल की किमान भारतातली सगळी विद्यापीठे तरी जोडलेली असतील.
आणि काही भारतीय कंपन्या तरी यात आपला व्यवसाय करायला लागलेल्या असतील.

भारतातच एक स्वतंत्र कंपनी स्थापून
या कंपनी द्वारे प्रो क्वेस्ट सारख्या विवीध संदर्भ विदागारांना शोधवाटा (गेटवे) देता येतील अशी मला खात्री आहे.
यातल्या काही डेटाबेस कंपन्यांना भारतात यायला सहकार्य मिळेल आणि भारतातल्या कंपनीला त्यांच्या
विदागारांचा एक्सेस!

असा दुवा म्हणून काम करणारी कंपनी उभी करणे हा डिजिटल लाय्ब्ररी उभी करण्यात महत्वाचा भाग ठरू शकतो.

ही कंपनी ताज्या संशोधनात्मक माहितीच्या पुरवठ्यासाठी अनेक उद्योगांशी आणि विद्यापीठांशी सहकार्य करार करून चांगले(च) पैसे मिळवू शकेल असे वाटते.

या साठी
१. कार्य नक्की काय करायचे आहे याचा पक्का विचार व्हावा.
२. एक व्यवसायाचा आराखडा (बिझिनेस प्लॅन?) बनवावा
३. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आणि किती काळात याचा विचार.
४. एक आस्थापन असणे गरजेचे.
५. मग विपणन/जाहिराती/आणि व्यवसायाचे जाळे विणणे (मार्केटींग)
६. एक अकाऊंटंट - आपण किती पाण्यात आहोत याचा कायंअ आढावा देऊ शकणारा
७. काही काळ तरी यात पुर्ण वेळ काम यात करावे लागेल, नंतर माणसे काम करू शकतील व आपल्याला वेळ मिळू शकेल (असे वाटते!)

यात अजूनही खुप वाव आहे असे माझे मत आहे. शक्य असल्यास खुद्द शोधवाटा (गेटवे) स्थापन करण्यात आजही आपण पुढाकार घेवू शकत असे वाटते.
या कार्यामुळे हे माहितीचे क्षेत्र नक्की कसे चालते याचे उत्तम आकलन तर होईलच,
शिवाय आर्थिक फायदा करून घेता येईल.
अजून फारशी स्पर्धा नसल्याने, वेळीच पाय रोवता येतील!


- निनाद

मंगळवार, जून २४, २००८

नवीन सायकल

थंडी पडायला लागली आहे.
सकाळी तर चांगलाच गारवा आता जाणवतो. कधी कधी छान सोनेरी उन पडते ते अंगावर घ्यावेसे वातते. मी कधी कधी मधल्या सुटीत फ्लॅगस्टाफ च्या उद्यानाता जाउन बसतो. हिरवे गवत आणि वर ढग नसले तर नीळेशार आकाश बघायला मजा वाटते.
पानगळ आता अगदी संपत आली आहे. रात्रीच्या थंडीतही उभीच असलेली विरक्त झाडं दुपारची कोवळी उन्हं अंगावर घेतांना मला आनंदी झाल्यासारखी वाटतात.
लोकंही मफलर, स्वेटर कानटोप्या असा जामनीमा करूनच बाहेर पडतांना दिसतात.
एकुण हा ही ऋतू सुरेख आहे.

मागे गार्गी आणि मी पार्क मध्ये गेलो होतो. तिची नवीन सायकल घेऊन. अजून चालवायला जमत नव्हती. मीच आपला मागून लोटत होतो.
मग जरासा जोर करून मीच तीला एका उतारावर तीचे तीला जायला पटवलं. तिलाही ते जरासे पटले.
मग मगे उभाराहून जरा जोर करून सोडले तीला उतारावर. मस्त गरगरत गेली ती खाल पर्यंत. भलतीच खुष झाली. पहिलीच राईड! पण सायकल काही ओढत परत वर आणता आली नाही तीला!

मग परत एकदा जायचे ठरवले. मात्र यावेळी जागा तिनेच बदलली. परत मी उतारावरून सोडले. थोडी गेली आणि अचानक हँडल वळवले... वेडीवाकडी होवून हिरवळीवर आपटली, लोळलीच. अचानक बसलेल्या धक्क्याने डोळ्यात पाणी!
पण तेव्हढ्या तिथे आलेल्या भू भू मुळे हसू परत...

बुधवार, मार्च १९, २००८

वाळलेली पानं

तेरा मेरा याराना याद करेगी दुनीया?
ते माहीत नाही पण काही गोष्टी विसरणेच शक्य नाही...
ती मैत्री... निखळपणे काहीतरी एकमेकांसाठी करण्याची इच्छा. ते पावसातले भिजणे, गाडीवर मनमुराद भटकणे. मागच्या रस्त्याला फिरायला जाणे.
आणि एकदा असंच खूप राग आल्यावर भांडून येतांना शिरीषाच्या झाडाची वाळलेली पानं एकदम एका वार्‍यानं आंगावरून जाणं... तसाच त्या वार्‍यात रागही उडून जाणं. एकत्र अभ्यास, प्रोजेक्टस... काय अजब दिवस होते ते.

बुचाची फुलं वेचणं, बँबीजवर कॉफी पीत संध्याकाळी घालवणं. हे तू वाचायलाच पाहिजे आहे म्हणून सावाना मधून एकमेकांसाठी पुस्तकं आणणं.
आणि त्या कट्ट्यांवर बसून काय बोलायचो इतकं? भटकणं आणि गप्पा काय पण दिवस. खास होते अगदीच.

गेले ते दिवसही आणि ती सगळी बरोबरची मैत्रीपण. मीच त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून आलो... की सगळेच आपापल्या दिशांना पांगले?
कुणास ठाऊक परत कधी भेटतो.... माहीत नाही! आठवण तर खूपदा येते. त्या काही खास आठवणी बरोबर घेऊन चाललो आहे म्हणून चालतो आहे.

शनिवार, मार्च १५, २००८

मी?

काय आणि कसं... काही कळतच नाहीये.
माझं काय चुकतं की अजून कुणाचं.

कुठे चाललोय मी?
असं का घडतंय हे सगळं?

अजून किती आहे असा अस्वस्थ काळ?
किती वेळ थांबायचं आहे आनंदासाठी? साधं सोपं जगणं नाहीच का नशीबी?
शेवटी नातं हे फक्त शब्दांचंच असतं बाकी काहीच महत्वाचं नसतं पण तुम्ही नेमक्या वेळी उच्चारलेले योग्य शब्द.
हेच फार महत्वाचे असतात.

पण किती शब्द आणि त्यांचे खेळ खेळत बसायचे? का?
आता काही काळ शब्दांविण काढला तर?
जखमा भरू दे काही काळ.

खुपच बोललो, सगळं मनातलं बाहेर टाकत गेलो.
दुखावणं दुखाऊन घेणं चिक्कार झालं. हे सगळं थांबावं आता.
आयुष्याचा आनंदही घेता यावा, कुणालाही प्रश्न न करता आणि कुठलेच उत्तर न देता.

कदाचित मनातलं मनात ठेवावं आणि फक्त ऐकावं - बाहेरचं आणि आतलं अगदी, आतलं मनातलंपण.

कदाचित त्यातच आनंद असेल, त्यातच शांतता असेल.

-निनाद