शनिवार, फेब्रुवारी २३, २००८

वेंद्रेदी स्वा

वेंद्रेदी स्वा (vendredi soir) हा फ्रेंच सिनेमा पाहिला.

शुक्रवारची पॅरिसमधली रात्र. लौरा आपल्या अपार्टमेंट मधली आवरा-आवरी करते. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत आता रहायला जाणार असते. ती आपल्या गाडीत बसून डिनरसाठी बाहेर पडते. रस्त्यावर आल्यावर तीला कळते की ती आज पब्लीक ट्रासपोर्टचा संप आहे. त्यामुळे सगळीकडे मोठा ट्रॅफिक जाम! ना ती पुढे जाउ शकते ना ती घरी जाउ शकते. तसेच तीचे आयुष्यही काही काळासाठी थबकते.

वेंद्रेदी स्वा2

रेडियोवर आवाहन होते की जमेल तशी लोकांना लिफ्ट द्या.
ती रस्त्याने जाणार्‍या 'जीन'ला पाहते. तो तीच्या काचे वर टकटक करतो.
ती लिफ्ट तर देते पण गाडी हलतच नाही. शेवटी गाडी सोडून देतात. पायी आपल्या मित्रांच्या भेटी गाठी करत फिरत असतांनाच एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढते. ही छोटीशी भेट अर्थात रात्रीच्या शॄंगारात बदलते.

एकमेकांच्या आयुष्यातले इतर कोणतेही संदर्भ न येता दोघे पॅरिस मधल्या एका साध्याशा हॉटेलमध्ये रात्रीचा आनंद लुटतात. (कंटेंपररी फ्रेंच सिनेमा मधे "कोणतेही संदर्भ न येता "हा भाग महत्वाचा झाला आहे आजकाल)

या सिनेमाची फोटोग्राफर एक स्त्री आहे. त्यामुळे शॄंगाराचे चित्रण वेगळ्याच एंगल्सनी होते आहे हे मात्र नक्कीच जाणवले.
किंवा काही ठिकाणी कॅमेरा स्थिरावतो आहे हे ही जाणवत राहते. हातांची पकड चेहर्‍यावरचे भाव.
वेंद्रेदी स्वा1
शिवाय अबोल क्षण... सिनेमातील पात्रे प्रणयात खूप काळ अबोलपणे घालवतात. चटोर प्रणय पण शारीर न करता केलेली वेगळीच फोटोग्राफी.

सकाळी लौरा उठते सगळा ट्रॅफिक जाम आता संपलेला असतो. रस्ते मोकळे आ॑हेत. औरा आता एक नवी व्यक्ती बनून एक वेगळेच मुक्ततेचे हास्य घेउन बाहेर पडते व नव्या दिवसाकडे निघून जाते...

अशा वन नाईट स्टँड मधून स्त्री पारंपारीकतेतून मुक्ततेकडे जाते आहे असा काहीसा भाग(?).

पॅरिस चे चित्रण नेहमीपेक्षा खूपच वेगळे आहे. काहीसे अनोळखी भासणारे आहे.

चित्रपट मी आधी दिलेल्या अ पॉर्नोग्राफिक अफेयर ला अगदीच समांतर आहे. यापुढे पॉर्नोग्राफिक अफेयर खूपच सुरेख आहे.

दिग्दर्शक :क्लेर डेनीस
लेखक : एमॅन्युएल बर्नहेम
इ.स. २००२
भाषा : फ्रेंच
प्र.भू. : वालेरी लेमर्सियर
विंसेंत लिंदाँ

२००४ चे क्लोत्रुदीस अवॉर्ड सिनेमॅटोग्राफीसाठी ऍग्नेस गोदार्दला मिळाले

-निनाद

डिलिव्हरी - भीक्कार निराशावादी सिनेमा

डिलिव्हरी
नावाचा एक ग्रीक सिनेमा आहे.
हा फुकट काय कुणी पैसे देवून बघायला सांगितले तरी पाहु नका.
इतका भीक्कार निराशावादी सिनेमा मी अजून पाहिला नव्हता!

इतक्या भीकार सिनेमाला व्हेनीस फिल्म फेस्टीवलचे गोल्डन लायन अवॉर्ड मिळाले आहे हे पाहून मला मोठाच धक्का बसला. म्हणजे उद्या मलाही एखादा सिनेमा काढायला हरकत नाही.
याशिवायही काही अवॉर्डस मिळाले आहेत...

दिग्दर्शकः निकोस पॅनयोटोपोलोस
लेखकः निकोस पॅनयोटोपोलोस
इ.स.: २००४
भाषा: ग्रीक

स्टोरीलाइनही देण्याची माझी इच्छा नाही.
अगदीच वाचावेसे वाटत असेल तर रिव्यु येथे वाचा
http://www.greekfilmfestival.com.au/filmfestival05/sydney/films/film_delivery.htm

-निनाद

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २००८

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन (Todas las Azafatas van al cielo)

हा स्पॅनीश चित्रपट पाहिला.
काहीशी विनोदी दक्षिण अर्जेंटीन मध्ये घडणारी कथा.

एक नुकताच विधूर झालेला तरूण डॉक्टर आपल्या दिवंगत पत्नीची रक्षा समुद्राच्या खाडीत टाकण्यासाठी येतो. ती स्ट्युर्डेस असते.
तो ही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतो.
त्याचवेळी त्या विमानात असणारी स्ट्युर्डेस पण एका प्रकरणातून प्रेग्नंट असल्याने आत्महत्या करण्याचा विचार करत असते.
त्याचवेळी बॉम्बची अफवा पसरल्याच्या कारणाने सगळी उड्डाणे रोखली जातात. ते एकमेकांच्याच शेजारच्या रूम्स मध्ये राहतात.
स्ट्युर्डेस आधार देणारी एक वेश्या भेटते. ती तीला मानसिक आधार देते.

दुसर्‍या दिवशी हे दोघेही आत्महत्या करण्यासाठी बर्फात उभे असतात व एकमेकांना पाहतात. व त्यांची ओळख होते.
गप्पा मारतांना एकमेकांच्या प्रेमात पडावे की न पडावे अश्या संभ्रमांत असतात.
दुसर्‍या दिवशी विमान वाहतूक परत सुरु होते. स्ट्युर्डेस हे प्रकरण मला नको म्हणून त्याला झिडकारून निघून जाते.
एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन1

विमानतळावरच्या सिग्नलमनच्या छोट्या मुलीची ओळ्ख या डॉक्टरशी होते.
ती त्याला आपले वडील दर वेळी विमान उतरले की त्याचा एक भाग चोरून आणतायेत व घरीच विमान बनवतायेत असे बरेच किस्से सांगते व तुझ्या गर्लफ्रेंडला मी ओळखते असेही सांगते.
डॉक्टर परत जायला निघतो पण त्याचा अपघात होतो. ४ महिने हॉस्पिटलमध्ये काढतो. त्याला कळते की त्याला बघायला म्हणून एक मुलगी येवून गेली आहे. तो परत त्या स्ट्युर्डेस चा शोध घ्यायला लागतो. स्ट्युर्डेस आधार देणारी वेश्या यालाही भेटते. ती त्याला तीच्या विषयी सांगते.
मध्ये बर्‍याच गोष्टी घडतात. त्या सिग्नलमन चे विमान उड्डाण यशस्वी होते.
पुढे शेवट काय होतो हे पडद्यावरच पहा. अनपेक्षित वगैरे नाही.
एकुण चित्रपट वेगळाच आहे.

एव्हरी स्ट्युर्डेस गोज टु हेवन

हा सिग्नलमन डॉक्टरला भेटल्यावर एका प्रसंगात म्हणतो की, "मी हे विमान माझ्या मुलीसाठी बनवतोय. मी काही आता रिकिमार्टीन ऐकण्याच्या वयात नाही पण आमच्या नात्यात काही तरी पॅशन तर असली पाहिजे असे मला वाटते. हा माझा विमानाचा प्रयोग व त्याची गुप्तता हा त्यातला मोठा भाग आहे."
त्या करामती सिग्नलमनची भूमीकाही छान आहे. त्याच्या मुलीनेही मस्त रंगवली आहे भूमीका.
मात्र मुख्य नायिका इन्ग्रिड रुबियो मक्ख वाटते. त्यापेक्षा जाडाजूडा डॉक्टर अल्फ्रेदो कॅसेरो चांगले काम करून जातो. बाकी काही समुद्रावरच्या फ्रेम्स सुरेख आहेत.

दिग्दर्शक : डॅनियल बर्मन
लेखक : डॅनियल बर्मन व एमिलोयानो तॉरेस (परत लेखक दिग्दर्शक एकच!)
इ.स.: २००२
भाषा: स्पॅनीश
सांता फे फिल्म फेस्टिव्हलचे लुमिनरिया Luminaria ऍवॉर्ड /त्रुवा इंटरनॅशनल चे गोल्डन डॉल्फिन Golden Dolphin मिळाले.
इंग्रजीमध्ये येथे रिव्यु आहेच http://www.plume-noire.com/movies/reviews/everystewardess.html

-निनाद

गुरुवार, फेब्रुवारी २१, २००८

... आणि मग परत उठायचं, सात वाजलेले. आवरायचं, डबा घ्यायचा, कामाला जायचं. लंच, परत काम. आल्यावर वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे बघत बसंणं.

मग झोपण्या मीच रेकॉर्ड केलेली गार्गी अनुची एखादी डिव्हीडी पाहणं... विचार करत करत काही गोष्टी आठवत झोपून जाणं. कधी कधी झोपच न येणं! मग परत आलेला सगळा आठव...

भेट, स्पर्ष, बोलणं, हसणं, मिस्कीलपणे पाहणं, आरोप, प्रत्यारोप, दुरावे, जवळीक विसरणं, लक्षात ठेवणं, रागावणं, चिडचीड, नकोसं होणं... हवंहवसं वाटणं, कधी तरी प्रत्यक्षाहून माझ्या मनातली प्रतिमाच सुंदर भासणं...

मग तीचं येणं नि हळूवारपणे धागे गुंतत जाणं. तीची काळजी... कधी कधी अतिच. ते वास, सुगंध, आंघोळ... श्वास, लय, पापण्या, हाताची मुठ, तीचा आवडता फ्रॉक...

किती चटकन दिवस बदलत जातात... सगळे काटे कधी वितळून फक्त आठवणींची मऊ मलमल आपसूकपणे हाताशी राहून जाते.
भराभर काळ जातो, हातावरची ती मोठी होवून चालायला कधी लागते कळतही नाही.

कधी जगायला मिळालच हे सगळं परत तर कसा जगेन मी आता?

हे नि झा यि कि

हे नि झा यि कि
काल हे नि झा यि कि (Together - He Ni Zai Yi Qi) टुगेदर हा सुरेख चीनी चित्रपट पाहिला.लु झाउचूं हा अतिशय टॅलेंटेड फक्त तेरा वर्षांचा मुलगा व्हायोलिन वाजवत असतो. या वाजवण्याची सुरुवात त्याने वयाच्या तिसर्‍या वर्षीच केलेली असते. त्याचे वडील लु चें नी त्याला चीन च्या ग्रामीण भागातील छोट्यागावात वाढवलेले असते.<"http://www.flickr.com/photos/53137010@N00/2281679212/" title="हे नि झा यि कि3 by katyare, on Flickr">हे नि झा यि कि3एक दिवस वडिलांना पत्र येते बिजिंग मध्ये एका स्पर्धेला येण्यासाठी लु झाउचूं ला निमंत्रण आलेले असते. वडिलांना वाटते की बिजिंग मध्ये आप्ल्या मुलाला मोठी संधी मिळेल. त्याला तेथे यश मिळेल. ते जाण्याचा निर्णय घेतात. आपले जमवलेली सगळी ठेव घेवून या प्रवासाला निघतात. बिजिंगच्या भल्यामोठ्या स्टेशनवर त्यांची चुकामूक होते. पण शेवटी ते परत सापडतात. त्या स्पर्धेत तो अधिकृत रीत्या पाचवा येतो. मात्र त्याचवेळी तेथे एक असलेला परिक्षक हा मुलगा खरं तर पहिला यायला हवा होता असं म्हणतांना त्याचे वडील ऐकतात. मग ते त्या शिक्षकाला गळ लु झाउचूं शिकवावे यासाठी घालतात. शेवटी कसाबसा तो शिक्षक तयार होतो.<"http://www.flickr.com/photos/53137010@N00/2281679292/" title="हे नि झा यि कि by katyare, on Flickr">हे नि झा यि कि लु झाउचूं पण उत्साहाने शिकवणी घ्यायला लागतो. त्याच वेळी त्यांच्या घरा शेजारी राहणारी एक मुलगी लु झाउचूं ला व्हायोलिन वाजवण्यासाठी बोलावते. त्याला त्या साठी पैसेही देते.लु झाउचूं चे आयुष्य बदलते. तो आपल्या असफल प्रेमाने निराश झालेल्या शिक्षकाला निराशेतून बाहेर काढतांना शिक्षण घेत असतो.
मात्र पुढे काय होते ते प्रत्यक्षच पहा. वडिलांचे काम करणारा नट अप्रतिम काम करतो. त्याची लु झाउचूं ला यशस्वी करण्याची धडपड अतिशय सुरेख उतरवली आहे. चित्रपट पाहतांना लु झाउचूं चा इतिहास अचानक समोर येवून जातो. युं तांग् ने व्हायोलिन वाजवण्यापासून सगळीच कामे उत्कृष्ठ केली आहेत.
वडिलांना यश हवे असते पण लु झाउचूं मात्र संगितावर प्रेम करतो. हा झगडा अप्रतिम आहे.
शिवाय लिलि चे काम करणारी हाँग चेन पण मस्तच आहे. <"http://www.flickr.com/photos/53137010@N00/2280887473/" title="हे नि झा यि कि4 by katyare, on Flickr">हे नि झा यि कि4
Together (He Ni Zai Yi Qi)
प्रभु - लु झाउचूं = युं तांग् (मुलगा)लू चेंग = पेकी लू (वडील)
इ.स. - २००२
भाषा - चीनी
लेखक - केज चेन व झाओ लू झे
दिग्दर्शक - केज चेन

अर्थात नेहमीप्रमाणेच एस बी एस कृपेने इंग्रजी टायटल्स सहीत! :)

-निनाद

बुधवार, फेब्रुवारी २०, २००८

जेवण
आज डबा आणला नव्हता.काय जेवायचे असा प्रश्न!
फुड जॉईंट्स मध्ये जावेसे वाटत नाही.
मग व्हिक्टोरिया मार्केटला चक्कर मारायला गेलो. तिथे आंबे दिसले, मग भला मोट्ठा आंबा घेतला. मोठा म्हणजे एक-दिड किलो पेक्षा मोठाच असेल असा.आणि त्याला जेवण म्हणून फस्त केले.

मजा आली. असे पण एक जेवण फक्त दोन डॉलर मध्ये! :-)

तुम्ही काय जेवला आज?

शनिवार, फेब्रुवारी १६, २००८

कॉमे तुत ल माँद
कालचा कॉमे तुत ल माँद Comme tout le monde - मि. ऍव्हरेज बरा होता. २००६ चा हा फ्रेंच चित्रपट पिएर पॉल राँदर्स ने दिग्दर्शीत केला आहे. हाच सहलेखकही आहे.
खलीद मादुर मुख्य अभिनेता.
जलील एक बालवाडीचा शिक्षक असतो, तो एक मि. ऍव्हरेज नावाचा खेळ जिंकतो. त्याच दिवशी त्याला क्लेर नावाची एक मुलगी भेटते. ही मुलगी मार्केटींग कंपनीसाठी काम करत असते. जलील एक अतिसामान्य माणूस असतो. व सामान्य माणसाला नक्की काय आवडते हे जाणून घेण्यासाठी त्याला लक्ष्य केले जाते. त्याच्यावर २४ तास पहारा ठेवला जातो त्यासाठी ६० कॅमेरे व ३० माईक त्याच्या घरात बसवले जातात. आणि क्लेर बनते त्याची खोटी प्रेयसी. त्याच्या कडून त्याला नक्की काय आवडते ही माहीती काढण्याचे काम तीचे असते. मात्र क्लेरला कुठेतरी हे सगळे रुचत नाही व ती काम मध्येच सोडण्याचा निर्णय घेते. जलील ला ती आपल्याला का सोडून जाते आहे हे कळत नाही व तो तीच्या मागे जाऊन विचारण्याचा प्रयत्न करते. शेवटी ती त्याला सोडून जाण्या आधी ती जलीलला कल्पना देते की नक्की काय होते आहे. जलील ते सगळे कॅमेरे फोडतो माईक्स शोधतो. त्या रेकॉर्डींगचे हक्क ताब्यात घेतो.
हे प्रकरण बाहेर आल्याने जलील अचानक नॅशनल हिरो बनतो. प्रेसिडेंटना ही त्याने आप्ल्याला मत द्यावे अशी अपेक्षा असते त्यामुळे जनमत आपल्याकडे झुकेल असे त्यांना वाटते. मात्र जलील अचानक पणे भलतेच भाकित करतो व सगळ्यांना चक्राऊन टाकतो.

शिवाय अस्वस्थपणे क्लेर पण गायब असते. जलील तीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
पुढे काय होते हे पडद्यावरच पाहा...

सिनेमाचे पोस्टरComme tout le monde 3
जलीलला गिनि पिग बनवणारे लोकComme Tout Le Monde
मध्ये बसलेले मुख्य पात्र जलीलComme Tout Le Monde 2

-निनाद कट्यारे

शनिवार, फेब्रुवारी ०९, २००८

कॅफिनकॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप प्रचंड का होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कोक अथवा पेप्सि या कंपन्यांच्या नफ्याचे आकडे पहिले तर वर्षानुवर्षे या कंपन्या जगातून किती पैसा गोळा करत आले आहेत याची जणिव होते. या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप सदैव चढत्या आलेखात कसा ठेवू शकतात? असे काय त्या ड्रिंक्स मध्ये आहे तर पाणी, साखर, कार्बनडाय ऒक्साईड आणी कॅफिन. इथे गोम आहे. या ड्रिंक्समध्ये कॅफिन आहे. बहुतेक सगळ्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये असणाऱ्या कॅफिन चा गुणधर्म हा त्या पदार्थाची चटक वा व्यसन लावण्यासाठी होतो. हा निष्कर्ष मेलबर्न येथील डिकिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. आर. जे. किस्ट व इतर, या शास्त्रज्ञांचा लेख 'ऍपेटाइट' या जरनल (२००५) मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या प्रयोगा नुसार, असे सिद्ध झाले की, कॅफिन मुळे कोक च्या चवी वर कोणताही परिणाम होत नाही. या प्रयोगात लोकांना कोक आणी कॆफिन नसलेले कोक सारखे पाणी दिले गेले परंतू कोणालाही, चवी मधला ऒळखता आला नाही!
का हे कॅफिन?मग तरी पण कोक अथवा पेप्सी सारख्या पेयां मध्ये कॅफिन का घातले जाते? याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात हे सत्य बाहेर आले की, कॅफिन नर्व्हस सिस्टिम वर परिणाम घडवून, मेंदूला परत परत तोच पदार्थ मिळवण्यासाठी उद्युक्त करते. कोक म्हणजेच कॅफिनयुक्त साखर असलेले द्रव्य मिळाल्याने आलेले तरतरी मेंदू लक्षात ठेवतो. आणि त्याच संबंध कोला पेयाशी जोडतो. थोडक्यात व्यसनाची सुरवात घडवून आणली जाते.लहान मुलांवर तर कॅफिन जबरदस्त परिणाम घडवते. नकळतपणे मुले जास्त जास्त कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स मागू लागतात, आणी या व्यसनाच्या अधीन होतात. हे सगळे तुमच्या नकळत पणे घडवले जाते. या संदर्भात एक जुने दंत-मंजनाचे उदाहरण आठवते. आपलेच दंत मंजन चालावे म्हणून पूर्वी त्यात तंबाखू घातली जात असे. रोजच तंबाखू चे सेवन केल्यामूळे त्याचे व्यसन लागत असे. त्यामुळे रोज सकाळी तास तासभर तोंडात बोट घालून बसलेले अनेक जण दिसत. तसे आता कॅफिन मुळे सवय लागलेले कोक ची बाटली घेतलेले दिसतात!
नक्की परिणाम?कोक पिण्याची सुरवात झाली की सर्वसाधारण पणे दूध पिणे कमी होते. काही वेळा याचा संबंध 'मी आता मोठा झालो' असाही जोडला जातो. हे आपण थम्प्स-अप विरुद्धं पेप्सी या जाहिरातीतून पाहिले आहेच. दूध कमी करून कॅफिनेटेड कोला घेतला तर काय परिणाम होतो या संदर्भात मेटे क्रिस्तेन्सेन व इतर यांनी एक प्रयोग केला. फक्त दहा दिवस चाललेल्या या प्रयोगात असे सिद्ध झाले की, दुधा ऐवजी कॅफिनेटेड कोला प्यायले असता, हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होते. अर्थातच सदैव कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने ही झीज अनेकदा भरून काढण्याच्या पलीकडे जाते. हाडे ठिसूळ होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या विकाराला ऒस्टेओपोरोसिस (?) असे नाव आहे.सदैवच कॅफिन आणि साखर पित राहील्याने पित्ताचे प्रमाण शरिरात वाढते रहाते. त्यामूळे यकॄताला जास्त काम करावे लागते. किडन्यांवर त्याचा ताण येतो. अश्या रीतीने विकरांची मालिकाच सुरु होते. (कुणी काही संदर्भ देवू शकेल काय?)
कोण असे म्हणते?या शिवाय वूल्फगाँग व इतर यांनी केलेल्या प्रयोगात मानसिक ताण-तणाव कमी जास्त होण्याच संबंध कॅफिनेटेड कोला पेयांशी आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.कोक आणि पेप्सी सॉफ्ट ड्रिंक चे युद्ध अमेरिकेत, ऐंशीच्या दशकात जोरात होते, त्यावेळी, कोक ने आपले धोरण बदलले. नवीन धोरणानुसार सॉफ्ट ड्रिंक ने सर्व नैसर्गिक पदार्थांची जागा व्यापली पाहिजे असे निश्चित केले. हे घडवून आणण्यासाठी, अमेरिकेच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कोक चे फ्रीजेस बसवले गेले. कॉफी, चहा आणी दूध या सर्वांची जागा कोक ने मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अर्थातच कंपनी चा सॉफ्ट ड्रिंक खप प्रचंड वाढला. परंतु याचे भयाण परिणाम अमेरिकन जनतेवर झाले. एका बाटली मध्ये सधारण दहा चमचे साखर असते. (संदर्भ?) सदैव साखर पाणी पित राहील्याने जाडपणा वाढला. (संदर्भ?)
तेथे आता डायबेटीस आणी ओबेसिटी अर्थात जाडपणाचा सरळ संबंध कोक शी जोडला जातो आहे.(संदर्भ?) हा संबंध उघड झाल्यावर, आपला खप खाली येऊ नये म्हणून, शुगर फ्री ड्रिंक्सचा उपाय या काढला गेला. पण नैसर्गिक साखर न वापरता आणलेला गोडवा आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम याविषयी संशोधन अजून व्हायचे आहे. एकेकाळी अमेरिकेत कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स पिणे 'कूल' होते, ते आता 'डंब' आहे. आता फ्रेश फ़्रुट ज्युसेस पिणे 'कूल' मानले जात आहे! (संदर्भ?)
कोण घेणार मग?प्रगत राष्ट्रांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक जाणिव वाढली आणि या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांचा खप खाली आला आहे. त्यामुळे त्यांना भारता सारख्यादेशां मध्ये हे कोला सॉफ्ट ड्रिंक्स खपविण्याशिवाय पर्याय रहिलेला नाही. कारण नफा मिळवणे हा एकमेव उद्देश या कंपन्यांचा आहे. त्यांना तुमच्या आरोग्याची काळजी असण्याचे कारणच नाही. जेंव्हा तुम्ही कोला सॉफ्ट ड्रिंक विकत घेता तेंव्हा या प्रचंड नफ्याचा पैसा कंपन्यांकडे जातोच आणि डॉक्टर ची बिले तुम्ही भरता. म्हणजेच तुम्ही, कंपन्यांना पैसा पुरवता, डॉक्टर, डेंटिस्ट, हॉस्पिटल ची बिले भरता, आणी असेलच तर मेडिकल इन्शुरंस चा वाढलेला हप्ता पण भरता! आणी हे सगळे वारंवार घडत रहावे म्हणून तुमच्या मेंदूवर कॅफिन काम करत रहाते.
वैधानीक इशारा?कॅफिन वर प्रयोग करणारे डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट, या प्रयोगाच्या शास्त्रज्ञांनी तर असे म्हटले आहे की, हे पेय कोणत्याही अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये. शिवाय 'व्यसन लागू शकते' असा वैधनिक इशारा कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक वर छापला पहिजे!या या शास्त्रज्ञांचे प्रयोग प्रसिद्ध झाल्या पासून कोणतेही कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक शाळेत विकण्यावर बंदी घालण्यासाठी अनेक सरकारांवर वर दबाव येतो आहे. भारतातही या सर्व गोष्टींची जाणिव सर्व सामान्य माणसा पर्यंत गेलीच पहिजे. आणी आपण सर्वांनी कॅफिन ला नको म्हंटले पाहीजे.
-निनाद२७-०९-२००७
याला संदर्भ म्हणता येणार नाही पण या लेखा साठी
http://lib.bioinfo.plhttp://www.21food.com वhttp://www.newstarget.com/003228.htmlhttp://www.theage.com.au/news/national/coke-in-the-firing-line-as-caffei...

या वेब साईट्स चा उपयोग केला आहे.
  • आपलाच पण आपणच विसरून गेलेला एक हिंदु भाग - इंडोनेशिया

    इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास
    रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.
    या देशाचे इस्ट तिमोर, मलेशिया व पापुआ न्युगिनी हे शेजारी देश आहेत. तसेच भारत(अंदमान निकोबार बेटे) , फिलिपाइंस, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर हे ही शेजारी देश आहेत.
    हा देश साडेतिनशे वर्षे डच अधिपत्या खाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धा नंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
    जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा भाषा इंडोनेशिया आहे. या शिवायही येथे अनेक बोली भाषा आहेत जसे भाषा जावा, भाषा बाली, भाषा सुंडा, भाषा मदुरा. येथे कावि नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावि भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
    यातील जावा हे बेट सर्वात मोठे असून त्या बेटावरील लोकांचे देशावर प्रभुत्व आहे. इंडोनेशिया मध्ये जगातली एक सर्वात मोठी जैवीक विवीधता आहे.

    इतिहास
    जीवाष्म अवषेशां वरून काढलेल्या निष्कर्शां नुसार पहिला आदिमानव येथे पाच लाख वर्षांपुवीचा सापडतो. याला जावा (इंग्रजी: जावामॅन) पुरुष म्हणून ओळखले जाते.
    असे मानणारा एक प्रवाह आहे की, सुमारे २००० वर्षांपुर्वी येथे पुर्वेकडील देशां मधून म्हणजे तैवान मधून लोक आले व त्यांनी या भागाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कला कौशल्य मिळवले. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदु तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले.
    त्या नंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर (आठवा अर्निको हा येथे पुर्वी आलेला लेख!) व प्रंभनन हे धारमीक शहरे वसवली. मजापहीत हे हिंदु राज घराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.
    प्राचीन राजे, वंश व साम्राज्य


    श्रीविजय राजवंश
    शैलेन्द्र राजवंश
    सञ्जय राजवंश
    माताराम राजवंश
    केदिरि राजवंश
    सिंहश्री
    मजापहित साम्राज्य
    मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळू हळू जम बसवत त्यांनी सुमात्र बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरवात झाली. सोळाव्या शतका पर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.
    इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्य नंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच इस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषीत केले.
    दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्या नंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागती नंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदलँडने आपला अंमल बसवण्याची धडपड सोदली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९
    मध्य इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

    भारताचा संबंध
    या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे.
    भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
    सुमारे पाचशे वर्षांपुर्वी हा देश एक हिंदु देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोक बाटवून मुसलमान करण्यात आले. व हा देश मुसलमान गणला जायला लागला. जाही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदु आहेत. हिंदु धर्माला येथे आगम हिन्दु धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांना चंडी नावाने ओलखले जाते. कारण यातले बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती.

    सद्य स्थिती
    इ.स. २००४ मध्ये आलेल्या सुनामी लाटा या देशाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करून गेल्या. येथील आचे नावाचे राज्यात किमान दिड लाख लोक मृत्युमुखी पडले होते.
    इंडिया व आशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया यास पुर्वी इंडोचायना असेही म्हणत.
    फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लीम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे.
    इ.स.१९९८ मधील आर्थीक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदी मध्ये जागतिक बँक यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र सुनामी लाटा व भुकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.

    ----------
    कृपया
    अजून कुणाला या संदर्भात माहिती असेल तर नक्की द्या.
    शुद्धलेखनाच्या चुका सांगा किंवा जमल्यास मराठी विकिवर इंडोनेशिया या लेखात दुरुस्त केल्यात तरी चालतील :-)
    आपल्या सहकार्या बद्दल आभारी आहे.

    -निनाद
ऑस्ट्रेलियाला येणे

ऑस्ट्रेलिया मध्ये देशांतर करण्यासाठी दोन प्रकारे व्हिसा मिळू शकतो. एक मानवताधारीत (ह्युमनेटेरियन) गुणवत्ता आधारीत (स्किल बेस्ड). या व्हिसावर कायमचा राहण्याचा परवाना (Permanenat Resisidency) मिळतो.
आफ्रिकेतील अनेक देशांतून जसे सुदान, इथिओपिया व श्रीलंका या ठिकाणांहून मानवताधारीत व्हिसावर अनेक लोक देशांतरीत झाले आहेत. हा फक्त कायमचा राहण्याचा परवाना आहे, नागरिकत्व नाही.

ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेण्यासाठी मुळ देशाचे नागरिकत्व सोडावे लागत नाही. जर मुळ देश दुहेरी नागरिकत्व मान्य करत असेल तर व्यक्ती दोन्ही देशांची नागरीक राहू शकते जसे की भारताचे.

ऑस्ट्रेलियाचे देशांतर कार्यालय (Immigration Office) गुणवत्ता आधारीत व्हिसाला प्राधान्य देते.
भारतातून येणारे लोक मात्र मुख्यतः गुणवत्ता आधारीत (इंग्रजी: Skill Based) व्हिसावर येतात. हा व्हिसा मिळवण्यासाठी व्यक्तीचे अनुभव ऑस्ट्रेलियातील व्यवसाय गरजेनुसार निर्धारीत केलेल्या श्रेणीतले असणे गरजेचे आहे. शासन ही यादी गरजेनुसार बदलत असते.
ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्या आधी आय. इ. एल. टी. एस. (IELTS) ही इंग्रजी ची परिक्षा ५.५ या गुणवत्तेने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परिक्षा फक्त दोन वर्षेच अधिकृत असते. दोन वर्षा आधी दिलेली परिक्षा ग्राह्य धरली जात नाही. अधिक माहिती ब्रिटिश कौंसील लायब्ररी मध्ये मिळेल. तसेच आय. इ. एल. टी. एस. च्या http://www.ielts.org/ या संकेतस्थळावरही मिळेल.

देशांतराचे अर्ज देण्यासाठी कामाचे अनुभव पत्रे मिळवणे गरजेचे आहे. या अनुभव पत्रात कामाचे स्वरूप त्याचे बारकावे लिहिणे आवश्यक आहे. (हे व्यक्तीगत पत्र नाही/नसावे त्यामुळे या पत्रात व्यक्ती म्हणून पात्रता, जसे विश्वसनियता आदी, याचा उल्लेख करण्या ऐवजी कामाच्या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे!)
या अर्जाची फी साधारणपणे २००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी आहे. याशिवाय पोलिस चेक व मेडिकल यासाठी लागणारे पैसे वेगळे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर साधारणपणे ५५ आठवड्यात परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळतो. असा व्हिसा असल्यावर येथे नोकरी मिळवणे सोपे जाते.

याशिवाय इतर प्रकारेही ऑस्ट्रेलियाला येता येते.
फिरायला येणे
फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. या साठी विमानाचे तिकिट (आयटेनरी) (व योग्य ते पैसे !) असने आवश्यक आहे. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळेलच असे नाही.

व्यवसाय व्हिसा
हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळेलच असे नाही.

शैक्षणिक व्हिसा
या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा मिळतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर परतणे आवश्यक आहे. शिक्षण जर योग्य त्या श्रेणीत बसणारे असेल, जसे शेफ, मोटार मॅकॅनिक, अकाऊंटंट इत्यादी तर पुढे परमनंट रेसिडेंट हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. सध्या ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्यासाठी तंत्रशिक्षण हा सर्वात चांगला कमी खर्चाचा मार्ग असु शकतो.

--------------------
देशांतरावरील अधिक ताज्या माहीतीसाठी हा दुवा पाहा www.immi.gov.au हा दुवा शासकिय असल्याने येथे दिली जाणारी माहिती विश्वसनिय आहे. तसेच ही माहिती वारंवार ताजी केली जाते.

-निनाद
पेट्रोल चा धंदा
भारतात इंधन व्यापारावरील म्हणजे (फ्युएल इंडस्ट्री) नियंत्रणे सैल होत आहेत. हे आपण अंगिकारलेल्या आता भांडवल वादी दृष्टीकोनाला धरुनच आहे. परंतु हे घडतांना या इंधन व्यापारातल्या कंपन्या योग्य रीती ने व्यवसाय करतील हे पण पहिले पाहीजे. उदारीकरणाच्या पुढील भागात अतिशय ताकदवान बहुराष्ट्रिय कंपन्या भारतात पाय रोवण्याच्या हालचाली घडवत आहेत. या शिवाय एस्सार आणि रिलायंस यांनी पण चंचूप्रवेश साधला आहे. बहुराष्ट्रिय कंपन्यांमध्ये शेल या डच कंपनीने ने प्रवेश साधून एक मोठा टप्पा गाठला आहे‌. शिवाय, बि.पि. (ब्रिटिश पेट्रोलियम) कॅलटेक्स आणि फ्रेंच कंपनी मोबिल पण भारतात येण्याच्या तयारीत आहेत.
या सगळ्यामध्ये फ्युएल रिटेलिंग चे भवितव्य साधारण काय असावे याचा वेध घेणे महत्वाचे. यात आधी हे लक्षात घेतले पाहीजे की, भारतातल्या काय किंवा परदेशी का या सर्व कंपन्यांना नफा कमावण्यात रस आहे म्हणून त्या येत आहेत. या कारणामूळे, त्यांची इंधन वितरण आणि विक्री याची कार्यपद्धती समजून घेणे महत्वाचे ठरते. भारतात येणाऱ्या बहुराष्ट्रिय कंपन्यांवर जगभारत नफेबाजी चे आरोप झाले आहेत. आफ्रिके सारख्या प्रदेशांत अनेक सरकारे विकत घेण्याचे आरोप शेल वर झाले आहेत. मात्र ओ. अँड एम. सारख्या मातब्बर ऍडव्हर्टायझिंग कंपन्यांकडून वेळोवेळी आपल्या नावाला रंग रंगोटी करुन परत जणू काही घडलेच नाही असा आव आणला जात असतो.
भारतात पुर्वी फक्त इंडियन ऑयल आणि भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनाच डिझेल/पेट्रोल वितरणाचे अधिकार होते. त्यामूळे पेट्रोल पंपाचे लायसंस मिळणे हे लॉटरी लागण्यासारखेच असायचे. या पंपांवर, पेट्रोल डिझेल आणि काही प्रमाणात ऑईल मिळायचे आणि मिळते. नियंत्रणे सैल झाल्यावर इतर कंपन्यांच पण प्रवेश या मध्ये होतो आहे, हे लक्षात आल्यावर इंडियन ऑयल आणि भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनाच खडबडून जाग आली. इतके दिवस ग्राहकांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या या कंपन्या अचानक पणे प्युअर फॉर शुअर सारख्या घोषणा द्यायल्या लागल्या आहेत. रिटेलर्स ना बाधून ठेण्यासाठी चुचकारत आहेत. पेट्रोल पंप तर सर्रासपणे वाटले जात आहेत.

अचानक पणे हा बदल घडतो आहे कारण, नव्या ट्रेंड प्रमाणे ज्या कंपनी चे जास्त पेट्रोल डिझेल चे वितरण जाळे असेल ती टिकण्याची शक्यता जास्त आहे. या मुळे अगदी शेजारी-शेजारी पंप उभे राहतांना दिसत आहेत. या रिटेलर्स ना नवीन वातावरणात धंदा कसा चालेल याची कल्पना मर्यादीत प्रमाणात आहे. जे काही ज्ञान आहे ते कंपन्यांचे अधिकारी देतील आणि जुने पंप कसे जोरात चालत असत येवढेच आहे. शिवाय पेट्रोलचे होलसेलचे दर हे सतत बदलते असतात. त्यात गुप्तताही राकहली जाते. पारदर्शकत अजिबातच नसते. म्हणजेच फसवणूकीला उत्तम वाव असतो. रिटेलर फसला तर तो गेलेला पैसा सामान्य ग्राहका कडून वसूल करणार हे निश्चित. म्हणजे शेवटी लुबाडला जाणार तो सामान्य माणूसच!
मात्र या वाढलेल्या वितरण जाळ्याचा पूर्ण फायदा कंपन्या घेणार आहेत असे दिसते.

हे सर्व चित्र धोकादायक आहे.
रात्री इरॉस थेरपी Eros Therapy (I Am Your Man) हा २००३ सालचा, फ्रेंच, काहीसा विनोदी सिनेमा बघितला पण काही आवडला नाही, काहीच्या काहीच होता. (आणि नावावर जाऊ नका, तसेही काही नाहीये)
मात्र सिनेमात काही अनपेक्षित वळणे इंटरेस्टींग होती त्यामुळे उत्सुकता टिकवू शकला, नाहीतर संपेपर्यंत झोप्लोच असतो.

दिग्दर्शक: डेनियल दुब्रॉ
प्र. भू. : कॅथरीन फ्रॉट, इसाबेल कार, फ्रांस्वा बर्लांड, आदी.

eros-therapy

eros-therapy1

रिह्यु येथे आहेच. http://en.unifrance.org/movie/25425/eros-therapy

एक न आवडलेला सिनेमा, अर्थातच एस् बी एस कृपेने सब टायटल्स सहीत!
-निनाद
अजुन एक फ्रेंच सिनेमा -
Une liaison pornographique (1999) (A Pornographic Affair)
आँ लियाझाँ पॉर्नोग्राफिक /अ पॉर्नोग्राफिक अफेयर पाहिला, वेगळाच विषय!

A Pornographic Affair

फक्त सेक्स करण्यासाठी म्हणून जाहिरातीतून, पॅरिस मध्ये नायक नायिका भेटतात. पण पुढे हे भेटणे तेव्हढेच रहात नाही.

त्यातला सेक्स हा भाग आधीच गेल्याने त्यांना एकमेकांची वेगळीच ओळख होत जाते व ते नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पण पुढे... पडद्यावर पहा (हा हा हा - कसा दुष्टपण केला मी)
नताली बे (बाये?) व सर्जी लोपेझ दोघेही मस्त. विषेशत: नतालीचा पहिल्या भेटीत असणारा अस्वस्थपणा झकासच दाखवला आहे. नंतरही मोकळेपणा मस्तच आहे.

नाव पॉर्नोग्राफिक असले तरी सिनेमा 'स्वच्छ' आहे. काळजी नसावी... (गेली बहुतेक निम्मी व्ह्युअरशीप ;-) )

रिह्यु येथे आहे http://sunday.ninemsn.com.au/sunday/film_reviews/article_638.asp

दिग्दर्शक: फ्रेडरिक फाँटेन
मुख्य पात्रे: नताली बे, सर्जी लोपेझ

मुळ सिनेमा फ्रेंच आहे. मला एस बी एस च्या कृपेने इंग्रजी सबटायटल्स सहीत बघायला मिळाला (म्हणून कळला)
काल रात्री परत एस बी एस वरच फ्रेंच सिनेमा Le Battement D'ailes Du Papillon ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ
(इंग्रजी: The Beating Of The Butterfly's Wings ) हा पाहिला.

ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ

जरा वेगळा. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेला काही ना काही अर्थ व कारण असते असा संदेश देणारा.

परत याचाही लेखक /दिग्दर्शक एकच आहे: लौरें फिरोदे

रिव्ह्यु येथे आहे http://en.wikipedia.org/wiki/Happenstance_(film)

सिनेमा बरा होता. ऑड्रे तातु ने (नायिका) इतका मक्ख पण केला आहे की विचारू नका (Audrey Tautou) पण बाकी एरिक सहीत इतर सगळे कलाकार चांगले आहेत

-निनाद
आमच्या कडे एस बी एस http://www.sbs.com.au नावाच्या चॅनलवर बहुतेक सगळ्या भाषातले चित्रपट येत असतात. त्यात मागे नाइन क्विन्स (Nueve reinas ) हा स्पॅनीश/ अर्जेंटिनाचा चित्रपट पाहिला.

खुपच मनोवेधक चित्रण, गतिमान व खुप गुंतागुंतीची कथा.

यातले रिचर्ड डरिन चे काम आवडले. सिनेमा काय आहे ते मुद्दाम सांगत नाही. मात्र शेवट चकित करून सोडतो. नक्की पाहा, मी सलग दोन वेळा पाहिला आहे. (त्याचे कारणही तुम्हाला कळेलच).

लेखन, दिग्दर्शन - फाबियां बेलिन्स्की

येथे
रिव्ह्यु १ http://www.ericdsnider.com/movies/nine-queens/">

रिव्ह्यु २ http://www.haro-online.com/movies/nine_queens.html">



नाइन क्विन्स - Nueve reinas

सोमवार, डिसेंबर १०, २००७

लंपन

लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.
महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावातले लंपनचे भावविश्व, संगीत, त्याचे आजीआजोबांच्या कडे असणे, बाबूराव, चंब्या, कणबर्गी गंग्या, परळ्या, यमज्या आणी इतर ही सगळीच पात्र सुरेख रीतीने एक अप्रतिम अनुभव विश्व आपल्या समोर प्रकाश नारायण संत उभे करतात. हे सगळे 'मॅड सारखे कितीही वेळा वाचले तरी त्याचा फेस काही डोक्यातून जात नाही.'
मी पाहिली कथा एका मासिकात वाचली, पण त्यावेळी काही कळलेच नाही. सुमी काय? हे पात्र सारखे प्रत्येक ठिकणी 'मॅड' का म्हणते? काय लिहिलेय हे? असा विचार करत राहिलो.
अचानकपणे काही दिवसांनी 'पंखा' हा कथा संग्रह अश्विनी कुलकर्णीने हातात ठेवला 'अरे हा घेऊन जा जसे काही तुझ्यासाठीच लिहिलेय हे पुस्तक अस समज' असं म्हणून!
एका दमात पुस्तक वाचले. नि वाचले नि परत परत वाचले. लंप्यानी त्यातल्या सावकाराच्या गोष्टीने एकदम मोहिनीच घातली. मग वनवास मिळवले, वाचले. अजून अजून लंपन हवाहवासा होत गेला. त्याचे निर्मळ विचार, सुमी चे असणे प्रगल्भ आजी-आजोबांची सोबत हवी हवीशी वाटायला लागली. मग शारदा संगीत. संगीताच्या सुरावर लंपनचा विहार, त्याची घसरगुंडी, यमज्याच्या 'टिंब' चे क्रिकेट. सगळ्याचे अगदी वेडच लागले म्हणाना!
शेवटी झुंबर! सगळे पुस्तक वाचले पण शेवटची 'स्पर्श' नावाची कथा एकदाच पूर्ण वाचली. मग ते नीट सगळ्या पुस्तकांच्या खाली ठेवूनच दिले. नकोच वाटायला लागले एकदम. लंपनचे मोठे होणे नकोसे वाटले! त्याच्या त्या 'नकादु' च्या मनोहर विश्वातून बाहेर येऊन विक्राळ प्रत्यक्षाची झालेली टक्कर खूपच त्रासदायक गेली मनाला. अजूनही मी ते वाचत नाही. सगळी पुस्तके कधीही काढतो. परत परत वाचतो, पण शेवटची कथा सोडून!
असे उमलणारे भावविश्व अगदी साध्या शब्दातून सामर्थ्यशालीपणे मांडणारे संत आज आपल्यात नाहीत. त्यांचे लिखाण वाचल्यावर जाणवत राहते की एका थोर लेखकाला मराठी मुकली आहे.
अगदी मॅड सारखे काहीतरी आता वाचत जावे असे वाटत असेल, तर लंपन ला नक्की भेटा एक वेगळाच अनुभव असेल तो.
प्रकाश नारायण संत यांचे कथा संग्रह - वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर.
( किंमती अगदीच ठीक आहेत रु.१०० ते रु.१५० च्या दरम्यान)
प्रकाशक - मौज प्रकाशन गृह
खटाववाडी, गिरगाव, मुंबई.
या शिवाय ही पुस्तके ऑनलाईन मायबोली डॉट कॉम वर उपलब्ध आहेत.
-निनाद

सोम, १६/०७/२००७
अर्निको व चीनी छपरांचे रहस्य!
बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने ओळखला जातो. या बलबाहू चा चीन, बिजींग, मध्ये पुतळा उभारला गेला. बलबाहू ने चीन मध्ये वास्तुशास्त्रात बाराव्या आणि तेराव्या शतकात केलेल्या कामाची आठवण म्हणून हे स्मारक उभारले गेले.
बलबाहू हा मूळचा नेपाळ मधील पाटण गावाचा रहिवासी होता. पाटण हे कांस्य व इतर धातूविषयक ओतकाम करण्या साठी फार प्रसिद्ध होते. अशा प्रकारे सुबक रितीने घडवलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तींना तिबेटाच्या राजे आणि दरबारी मंडळींकडून चांगली मागणी होती. बोरोदूर या इंडोनेशिया येथील स्तूपाच्या कामासाठी सन आठशे मध्ये येथून लोक गेले होते.
धातूकामा शिवाय ही मंडळी वेदातून मांडलेल्या 'आरेखने व मांडणी' या विषयातही तरबेज होती. नेपाळ हे भारतीय आणि चीनी संस्कृतीचा संगम बनले होते. ही नेपाळी कारागिरांची कीर्ती चीन च्या मिंग या राजघराण्या पर्यंत गेली. बाराव्या शतकाच्या मध्यावर चीन च्या राजांनी नेपाळ च्या राजांना विनंती केली की, त्यांना नवीन बांधून हव्या असणाऱ्या श्वेत स्तूपा साठी कारागीर पाठवावेत. या कामासाठी पाटण गावातून ऐंशी कुशल लोक निवडले गेले. या पथकाचा प्रमुख म्हणून, बलबाहू ची नेमणूक राजांनी केली. असे मानले जाते की या वेळी बलबाहू फक्त सतरा वर्षांचा होता. हे पथक मजल- दरमजल करत चीन च्या बिजींग या शहरात पोहोचले.
एक पोरगेलासा कारागीर का या स्तूपाचे आरेखन आणि बांधणी करणार, असा विचार करून बलबाहू ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीच्या राजाचा एक भग्न पुतळा त्याला दुरुस्ती साठी दिला. हा पुतळा बलबाहू ने इतका सुरेख रित्या दुरुस्त केला की चिनी कारागीर चकीत झाले.
शेत स्तूपाच्या कामासाठी बलबाहूची नेमणूक करण्यात आली. सर्व रेखाटणे व धातूच्या तुळयांचे काम बलबाहू ने केले. हे काम यशस्वी रित्या पूर्ण करून बलबाहू ने राजा विश्वास संपादन केला. या नंतर चीन मध्ये अनेक वास्तूंची कामे त्याने केली. बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने प्रसिद्ध झाला. (कसा आणि का ते कळले नाही, शोध सुरु आहे) चिनी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उतरत्या टोकदार, डौलदार व एकाखाली एक अशा छपरांची परंपरा अर्निकोनेच सुरू केली. या डौलदार छपरांच्या कमानी टोकांवर तो (भारतीय परंपरेशी नाते सांगणारा) कळस बसवत असे. सुबक कळस आणि आणि एकाखाली एक अशा छपरावरच्या धातूच्या चमकदार कमानींची लाटच चीन मध्ये आली. बिजींग मध्ये त्याने अनेक भव्य अशा वास्तूंचा उभारणी कामात सहभाग घेतला. शहराच्या मांडणी मध्ये महत्वाचे योगदान दिले. या सगळ्याची पावती म्हणून राजाने त्याला उपाधी दिली. (उपाधीचे नाव कळले नाहीये अजून.)
अर्निकोने एका चिनी मुलीशी लग्न केले आणि चीन मध्येच राहिला. असा हा बलबाहू अर्निको भारतीय स्थापत्यशास्त्राचा झेंडा चीन मध्ये रोवून तेराशे सहा मध्ये मृत्यू पावला.
-निनाद

सोमवार, एप्रिल ०९, २००७

निघालो जरा घाई गडबडीतच. गार्गीची छोटी बॅग, बदलायचे कपडे, पाण्याची बाटली अश्या गोष्टींची खातरजमा करून घेत निघालो. आज अनु चा नोकरी साठी इंटरव्ह्यू होता. त्यामुळे पावणेदोन वर्षाच्या गार्गी ला मी पाळणा घरात सोडणार होतो. पटापट आवरून गार्गीला तिच्या सीट मध्ये ठेवले. बेल्टस लावले. अनु येऊन बसताच निघालो. गाडीने पाच-सात मिनिटावर पाळणाघर. छान सकाळचं सोनेरी ऊन पडलं होतं.
आता पर्यंत अनु ने गार्गीला पाळणा घरात सोडले होते. ती पण पहिल्या वेळेला सोडताना अस्वस्थ झाली होती. आज माझा पहिलाच दिवस होता. अनु किती वेळात बॉक्स हील स्टेशनला पोहोचू, पत्ता घेतला आहे की नाही या गोष्टींवर बोलत होती. शिवाय 'अरे इतकं काही नाही, फक्त निरोप घेण्याची वेळ अगदी माफक ठेव' असं काही बाही सांगत होती. मी जमेल तसं तिला 'हो ला हो' करत होतो. मनात अस्वस्थता माजली होती. व्हाईटहॉर्स रोड वरून जाताना गार्गी चं पाळणा घर दिसत होतं. गार्गी मजेत बसली बसली होती कुठलं तरी गाणं म्हणत. आरशात माझे डोळे तिला दिसतांच चेहऱ्यावर हसू आलं. मला तिला पाळणा घरात सोडायचं अजूनच वाईट वाटायला लागलं. बॉक्स हील स्टेशनच्या पार्किंग मध्ये अनुला सोडलं. गाडी परत वळवून व्हाईटहॉर्स रोड च्या पाळणाघरा जवळ आणली. अजूनही गार्गी मजेत होती पण तिला 'ती पाटी' दिसल्यावर तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले आहेत हे माझ्या लक्षात आले.
तेवढ्यात अजून एक चिनी आजी तिच्या नातवाला सोडायला आली. त्या पोराने मोट्ठे भोकाड पसरले. गार्गी चा चेहरा अगदीच पडून गेला होता. मग मी त्या मुलाला आधी जाऊ दिले. तरी पण गार्गी ने मला घट्ट मिठी मारली होती ती अजिबात सैल केली नव्हती. बहुदा तिला अजूनही आशा होती की बाबा तिला सोडून जाणार नाही. पाळणा घराची चार दारं उघडून मी आत जायला लागलो. मघाचा मुलगा रडायचा थांबला होता. पण डोळ्यांत पाणी होतं. गार्गी 'मला नक्को, मला नक्को, मला नक्को, चल चल असं दाराकडे बोट दाखवून म्हणत होती. पण तो कठोर क्षण आलाच होता.
मी मनातल्या मनात 'आता वेळ लावायचा नाही हा क्षण अगदी छोटा ठेवायचा आहे' अशी उजळणी करत होतो. आता गार्गी ला पक्के कळले होते की बाबा सोडून जाणार आहे. तिने मोट्ठे रडे सुरू केले होते. पाळणा घरातली मुलगी तिला घेऊ पाहत होती पण गार्गी मला पक्की चिकटून बसली होती. परत परत माझ्याकडे काहीश्या अविश्वासाने आणि काहीश्या आशेने पाहत होती. डोळ्यातले पाणी आता गालांवरून पाणी वाहत होतं. मला मनातल्या मनात कसंतरीच वाटत होतं. तरीपण मी निग्रहाने मी ती ला सांगितले की मी आता जातो आहे, पण थोड्यावेळात परत येईन. मनात वाटत होतं की इथेच थांबावं. पण एका क्षणी झटकन तिला पाळणा घरातल्या मुली कडे देऊन बाहेर आलो. तिचा मोट्ठ्याने रडायचा आवाज येत होता. मी जरा थांबलो. एका मिनिटात रडण्याचा आवाज थांबून गेला. मी हळूच डोकावून पाहिलं तर ती इतर अजून कोण कोण इथे आहेत हे पाहत होती.
मी जड पावलांनी चालत एक एक दार उघडत बाहेर पडलो. मला अनुने पहिल्यांदा गार्गी ला सोडले तेव्हा फोन केला होता ते शब्द आठवले 'निनाद, फार अवघड आहे रे हे सोडून येणे... आपल्याला ठेवायलाच पाहिजे का रे तिला इथे?'. तेव्हा मी मारे जोरात म्हणालो होतो 'हो आता तिला पण मित्र मैत्रिणी मिळायलाच हव्या आहेत वगैरे वगैरे' आणि आता?.
गाडी काढली, एक वळण घेऊन विमनस्कपणे रस्त्याला लागलो.
काचेतून येणारं ऊन टोचऱं वाटत होतं.

रविवार, फेब्रुवारी २५, २००७

फाईल अशी नुस्ती घेत नाही मी

नोटेच्या चष्म्याशिवाय अक्षरही बघत नाही


माझा चहा संपला आहे कधीचा

कोणी नवीन बकरा कसा येत नाही?


मिळालेच नाही काल कोणी मला

एकाही फाईलला हात लागला नाही.


आलेली प्रत्येक फाईल पूर्ण करतो मी

मात्र 'वजना' शिवाय काहीही हलत नाही


फायलींचा हा ढीग माझ्या टेबलावर

पैज लावा 'खालून' आल्याशिवाय पुढे जात नाही


वागतो तू असा साहेबाच्या चमच्यागत

म्हणूनच तूझी कधी ट्रान्सफर होत नाही.
ऑफिस मध्ये आल्यावरही

काम काही सूचत नाही

पण नुस्ताच पगार घेणे?

छे! छे! तेही मनाला रुचत नाही



म्हणून मी काही असाच

खुर्चीवर बसून रहात नाही

एक दोन कागद शोधून

करतोच एखादी तरी सही

आणि राहीली एखादी फाईल तरी

काम काही फार अडत नाही



हे मात्र खरं आहे हल्ली काम उकरुन पण

फार काही सापडत नाही

येणाऱ्या जाणऱ्यांना पकडून

मारतो गप्पा काहीच्या बाही

गप्पाही आता साऱ्या सरत आल्या

हल्ली नाही कोणी बोलायलाही



घरी गेल्यावर शॉवर घेउनही

मनाची तगमग काही कमी होत नाही

सायंकाळी वाईन ची बाटली

खुणावल्याशिवाय रहात नाही


मस्त दोन ग्लास झाल्यावर

काव्य पण लांब रहात नाही


लिहून असल्या या भिकार कविता

मनोगता वर सुद्धा मी

लोकांना सोडत नाही

-निनाद

हा हाप्रे. कारकून (शुक्र,